Like & Share This page

Friday 29 April 2016

सैराट म्हणजे सैरभैरपणा.


नागराज मंजुळे हा माणूसच सैराट आहे.
त्याच्या अभिव्यक्तीमधलं सैराटपण हे सिनेमात दिसतं,मग ते सिनेमाच्या लेंग्थपासून ते त्यामधल्या विषयाच्या मांडणीपर्यंत… सैराट म्हणजे सैरभैरपणा… त्यामधला असणारा विस्कळितपणा पण त्याला एक वेग आहे… आवेग आहे… जगण्यातले असे काही क्षण असतात की जिथे आपल्याला हा वेडेपणा करावासा वाटला. त्या सगळ्यामधला तो मोह पाडणारा क्षण जो आहे, तो आपल्याला सैराटमध्ये टिपलेला आपल्याला जाणवतो. या सिनेमात असलेला तो माहौल… आपल्या मनाचा ठाव घेतो. प्रेम ही भावना सार्वकालिक अन् वैश्विक आहे
नागराजच्या फॅण्ड्रीचे ठसे मनात असतात… पण सैराट हे प्रकरण वेगळं आहे… मुळात त्यामध्ये 1 तास 50 मिनिटांचा पूर्वार्ध अन् उत्तरार्ध आणखी तासभर असलेला हा खेळ. मुळात… … . त्यामधलं गाव… गावातील प्रेमप्रकरण अन् त्या प्रेमाच्या सफलतेसाठी केलेली जद्दोजहद… या सगळ्यामध्ये इतकी धमाल आहे… त्यामधला असणारा सच्चेपणा हा सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेतो. पण यामधल्या कलात्मकतेचा भाग हा उत्तरार्धात सुरु होतो…. अन् आपल्या रोजमर्रा जगण्याचा भाग तो दिसू लागतो. त्यामुळे एकीकडे पूर्वार्धात आपल्याला दिसलेलं प्रेमाच्या इंद्रधनुला ज्यावेळी गालबोट लागतं. त्यावेळी सिनेमाला आलेलं वास्तवाचं कोंदण आपल्याला त्रास देऊ लागतं. पण क्लायमॅक्सला नागराज आपल्याला अशा एका वळणावर आणून सोडतो की, आपण निशब्द होतो… त्यावेळी ही एपिक लव्हस्टोरी न राहता त्यामधलं सामाजिक भान आपलं मन पोखरु लागतं.
एक दुजे के लिए, कयामत से कयामत तक, गोलियों की रासलीला.. रामलीला… या सगळ्या गोष्टींमधला असणारा फॅक्टर आपल्याला या सैराटमध्ये अनुभवायला मिळतो… पण तो सोलापुरी…करमाळा स्टाइलमध्ये अन् त्याला असलेला नागराज मंजुळेचा टच… या सगळ्यामुळे सिनेमाला मातीचा गंध मिळतो. जवखेडा सैराट ही गोष्ट आहे ती आर्ची अन् परशाची…आर्ची म्हणजे अर्चना पाटील अन् परशा म्हणजे प्रशांत काळे… पाटलाची मुलगी अन् तिच्या गावातील मासे विक्री करुन पोट भरणाऱ्या काळे कुटुंबातील मुलगा. आर्ची म्हणजे गावातील डॅशिंग मुलगी… जी बुलेटही चालवते… अन् ट्रॅक्टरही…ती सधन आहे… पण परशा तशा अर्थाने एका झोपडीवजा घरात राहतोय तर आर्चीचं घराला मजला ही आहे… हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना वेगळ्या अर्थाने महत्त्व आहे कारण वरच्या अन् खालच्या या शब्दांमधली जी दरी आहे ती आपल्याला इथे जाणवते.

परशाचा आर्चीवर जीव असणं अन् त्या प्रेमाच्या पूर्णत्त्वासाठी आर्चीने पुढाकार घेणं अन् मग या दोन प्रेम करणाऱ्यांच्या विरोधात उभा राहिलेला हा जालिम जमाना…. या सगळ्यात पुढची गोष्ट एव्हाना तुम्हाला कळली असेल… त्यामुळे सूज्ञास अधिक सांगण न लगे…
पण सिनेमा पाहताना प्रकर्षाने जाणवतं की, पूर्वार्ध अन् उत्तरार्घ हे दोन वेगळे सिनेमे आहेत… जे एकाच तिकिटावर आपल्याला पाहायला मिळतात. सैराटला असणारा मातीचा गंध हा त्यामधली सर्वात गोष्ट आहे… क्लायमॅक्स तुमच्याने मनाला चटका लावून गेला नाही तरच नवल अन् ते सारं लहान मुलाच्या दृष्टिकोनाने चित्रित केलं आहे… त्यासाठी नागराजला स्पेशल ब्राऊनी पॉइण्ट्स.

नागराजच्या सैराटची शक्तीस्थानं पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये दिसणारा रॉनेस… जो आहे… मातीशी भिडलेला असणं… अन् त्याची पात्रं निवड. आर्ची अन् परशापर्यंतच हे सारं मर्यादित राहत नाही. त्यामधला प्रदीप… त्यामधला फेंगडेपणा अन् सल्या… त्याच्या चेहऱ्यावर असणारा काही भावांचा अभाव… अन् व्यक्त होण्यातील निरागसता… या साऱ्या गोष्टी सिनेमातील पात्रांना अधिक पूरक अन् पोषक ठरत असतात. नागराजने छोट्या छोट्या गोष्टी अधिक तरलपणे दाखवल्या आहेत. वर्ण अन् जातीपातीवर थेट भाष्य न करताही त्यामधलं द्वंद्व ज्या प्रकारे अधोरेखित केलंय ते पाहताना ठिणगीचा वणवा होण्यातील ताकद फार महत्त्वाची वाटते. या सिनेमातील क्रिकेट मॅचमध्ये पात्र मनात उभारण्यासाठी घेतलेला वेळ असो वा विहिरीमधील सिक्वेन्स महत्त्वाचा वाटतो… अगदी चिठ्ठी देण्याच्या सिक्वेन्सपासूनचा असलेला हा खेळ महत्त्वाचा वाटतो. तिथपासून सुरु झालेला प्रवास अन् त्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्याप्रकारे हे सारं प्रेम आकाराला येत असणं त्यामधल्या ऊसाच्या फडात तिने त्याला आय लव्ह यू म्हणणं असेल वा मी एकटीनेच शेतात जातेय यामध्ये अनुराग कश्यपच्या देव डीमध्ये नायिका शेतात सायकलवरुन बिछाना नेते… या सगळ्या गोष्टींइतकंच ते बंडखोर वाटतं. पण नागराजच्या स्त्रीप्रतिमांमधला सोशिकपणा अन् तरीही त्यांच्यामधला हळवेपणा हा कुठे हरवलेला नसतो. स्त्री ही तितकीच सक्षम असणं हे या सिनेमातलं शक्तीस्थान वाटतं. परशासोबत शेतात फिरताना आपल्या मैत्रिणीला परशाच्या मित्रांना तिने शेत दाखव म्हणून सांगणं या सगळ्या गोष्टी खूपच बोल्ड असल्या तरी त्या इतक्या सहजतेने दाखवल्या आहेत.
यामधलं अलिखित अप्रतिम असणारी गोष्ट म्हणजे अजय अतुलचं संगीत. यामधल्या प्रत्येक गाण्याचा असा स्वतंत्र फ्लेवर आहे. त्याला असणारा एक माहौल आहे. त्यामधला ठेका आपण नकळत धरतो. ही अजय अतुलच्या संगीताची जादू आहे… मग याड लागलं असो, झिंगाट असो… वा सैराट झालं जी… सारी गाणी सोलफुल आहेत. आपल्याला जाणवतं की, सिनेमाचा यूएसपी आहे…
रिंकू राजगुरु या मुलीने वयापेक्षा दाखवलेली समज अन् त्या पलीकडे तिने उभं केलेलं आर्चीचं पात्रं… सिनेमात जान भरतं… तिच्या वागण्याबोलण्यात… तिच्या डोळ्यांमधली चमक… तिच्यामधल्या नवखेपणात अन् त्या मधल्या डॅशिंगनेसचं कौतुक आहे. तिचं व्यक्त होणं अन् त्यामधल्या निरागसतेमध्ये असणारी एक वेगळी गंमत आहे. आकाश ठोसरही आपला चांगलाच ठसा उमटवतो. त्याच्या व्यक्त होण्यात… रोखून बघण्यात एक मज्जा आहे. त्याच्या सगळ्या प्रकरणात एक शार्पनेस आहे. त्याच्या करमाळामधल्या ट्रेन जातानाच्या डान्स सिक्वेन्सपासून मित्रांसोबतचा मग अडथळ्यांची शर्यत पार पाडणारा म्हणून आपल्यासमोर येणारा असा परश्या त्याने जिवंत केला आहे. प्रदीप अन् सल्या या व्यक्तिरेखाही चांगल्याच रंगल्या आहेत. त्यामधला स्पार्क आपल्याला जाणवतो. त्यांच्या मैत्रीत… जिवाला जीव देण्याच्या मित्रासाठी जिवाचं रान करण्याच्या गोष्टींमध्ये असणारा निरागसपणा रंगत आणतो.
यामध्ये झी स्टुडिओजचा सर्वेसर्वा निखिल सानेचं विशेष कौतुक आहे… एक बिझनेस मॉडेल ज्याप्रकारे उभं केलं आहे… झी स्टुडिओजचं ते पाहता त्यामध्ये व्यावसायिकता अन् कलात्मकतेचं सुवर्णमध्य इथे गाठण्याचा केलेला प्रयत्न म्हणून हे सारं निश्चित कौतुकास्पद आहे. प्रदीप अन् सल्या ही दोन पात्रंही आपल्या काळजाचा ठाव घेतात… पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या प्रकारे सिनेमा पोहोचविण्यासाठी ज्याप्रकारचे कष्ट घेतलेत अन् अशा कॉण्टेण्टवर विश्वास दाखवलाय, ही गोष्ट महत्त्वाची वाटते अन् ती ज्याप्रकारे आपल्यासमोर उलगडत आणली आहे. त्यामध्ये त्या उलगडण्यामध्ये एकप्रकारची चमक आपल्याला जाणवते….
सैराट हा सिनेमा आपल्याला तब्बल पावणे तीन तासापेक्षा जास्त काळ खुर्चीत बसायला लावतो. उत्तरार्धातला असणारा सररिअलिझम आपल्या पचनी पडत नाही असं वाटतं. कारण पूर्वार्धामध्ये आपल्याला गुलाबी स्वप्न दाखवलेलं असतं… पण त्या सगळ्यात गणित आपल्याला जरासं जड जातं. पण नागराज आहे… त्यामुळे वास्तवाला भिडणं आलंच. त्या सगळ्यामधील गंमत आहे ती पूर्वार्धात वाटत राहते, कारण प्रेमाचे रंग पाहिल्यानंतर आपल्याला वास्तवाचा काळा अन् राखाडी रंग बघायला मन तयार होत नसतं.
पण नागराजने हे दोन्ही खेळ तितक्याच लीलया करुन दाखवले आहेत. त्यामधला रोमॅण्टिक भाग त्याने ज्याप्रकारे रंगवला आहे कारण वास्तव दाखवण्यात त्याचा हातखंडा आहे अन् त्याने पिस्तुल्या अन् फॅण्ड्रीमध्ये ते दाखवून दिलं आहे, पण इथे पाहताना आपल्याला त्याचा रोमॅण्टिक भाग त्याने मांडणं अन् त्यामधला भाग ज्या तरलतेने दाखवला आहे. त्यामुळे नवं पेललेलं आव्हानही त्याने चमकदार पद्धतीने पेललं आहे, पण या मधला उत्तरार्ध अन् त्यामधलं वेळेचं गणित अधिक कात्री लावून सोडवणं गरजेचं होतं असं वाटत राहतं… त्यामुळे लांबलचक झालेल्या सैराटपणाचा उत्तरार्ध काहीसा त्रास देणारा आहे… जवखेडा प्रेमप्रकरण आठवलं तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपसूक मिळतील.

सैराटला #FunnyFinternet देतय 5 स्टार्स.